कृषीतंत्र

आंबा लागवडीसाठी सिआरए तंत्रज्ञानाचा कृषी विभागाकडून वापर

जामखेड तालुक्यातील ओंकार दळवी यांच्या शेतात पहिला प्रयोग

सचिन आटकरे :जामखेड तालुका कृषी अधिकारी रविंद्र घुले यांनी पदभार घेतल्यानंतर त्यांनी तालुक्यातील शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ व्हावी यासाठी काम सुरू केले असून या अंतर्गत त्यांनी पहिले पाऊल टाकले असून प्रमुखाने देशातील तमिळनाडू राज्यात आंबा व इतर फळबाग लागवडीसाठी वापरण्यात येणाऱ्या सिआरए (क्लायमेट रेझिलियंट अॅग्रिकल्चर) तंत्रज्ञानाचा वापर जामखेड तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी करण्याचे नियोजन केले असून त्यानुसार जामखेड कृषी विभागाने पहिल्यांदाच भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेअंतर्गत ओंकार दळवी यांच्या शेतात आंबा पिकाच्या फळबागेची लागवड करताना या तंत्रज्ञानाचा वापर केला असून नव्याने विकसित झालेल्या सिआरए तंत्रज्ञानाचा शेतकऱ्यांनी वापर करावा असे आवाहन तालुका कृषी अधिकारी रवींद्र घुले यांनी केले.

जामखेड तालुका कृषी विभाग व फार्मर फॉर फॉरेस्ट पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने जामखेड येथील पत्रकार ओंकार दळवी यांच्या शेतात सी आर ए तंत्रज्ञानाचा वापर करून आंबा लागवड शुभारंभ करण्यात आला. यावेळी तालुका कृषी अधिकारी रवींद्र घुले, मंडळ कृषी अधिकारी कोमल हिरडे, कृषी पर्यवेक्षक रावसाहेब डमरे, कृषी सहाय्यक अमोल बहिर, पत्रकार संजय वारभोग, दिपक देवमाने, समिर शेख, पत्रकार सचिन अटकरे, फार्मर फॉर फॉरेस्ट च्या संस्थापक अध्यक्षा कृतीका रवीशंकर, विभाग प्रमुख मनिषकुमार सिंग आदींसह शेतकरी बांधव उपस्थित होते.

जामखेड तालुक्यातील शेतकऱ्यांनी “सिआरए” तंत्रज्ञानाचा जास्तीत जास्त वापर करावा :  रविंद्र घुले,तालुका कृषी अधिकारी जामखेड.

या तंत्रज्ञाना बद्दल माहिती देताना तालुका कृषी अधिकारी रवींद्र घुले म्हणाले की, वृक्ष किंवा फळबागांची रोपे – कलमे लावण्याच्या जागी दोन बाय दोन फूट खोलीचा खड्डा खोदून खड्डयाच्या दोन किंवा चार कोपऱ्यांत दोन फूट लांबीचे पीव्हीसी पाइप रोवले जातात. यानंतर गांडूळखत, शेणखत व मातीने खड्डा तीन चतुर्थांश भरून घेतला जातो. यावेळी पाइप सरळ रेषेत राहतील याची काळजी घेतली जाते. खड्डयात रोप लावून | माती भरून घेतली जाते. यानंतर सर्व पाइपमध्ये अर्धा फूट गांडूळ खत (शेणखत) व जमीन पातळीपर्यंत वाळू भरण्यात येते. त्यानंतर पाइप हळूवार वर ओढून बाहेर काढले जातात. ते पुढील लागवडीसाठीही उपयोगी ठरतात. हळूवार पाइप काढल्याने दोन किंवा चारही कोपऱ्यांत वाळूचा दोन फूट खोलीचा सलग ‘कॉलम’ तयार होतो. रोपांना दिलेले पाणी प्रथम चार कॉलम्समध्ये शोषले जाते. कॉलम पाण्याने पूर्ण भरला की आजूबाजूला पाणी झिरपण्यास सुरवात होते. अशा प्रकारे मुळांच्या परिसरास तात्काळ ओलावा मिळतो. गांडूळ खत किंवा शेणखतामुळे पाणी धरून ठेवले जाते. त्यातून मुळांना अन्नद्रव्ये मिळतात. रोपांची वाढ झपाट्याने होते. सशक्त झाड निर्माण होते. काही ठिकाणी ओबडधोबड वाळूचा उपयोग केला तरी चालतो. बाल्यावस्थेतच काळजी घेतली तर वाढ चांगली होऊन अवर्षणाला तोंड देण्याची रोपांची क्षमता वाढते ठिबकला ‘सीआरए’ ज्या ठिकाणी ठिबक बसवले आहे तेथे ड्रीपर हे वाळूच्या ‘कॉलम’वर येईल याची दक्षता घेतली जाते. ठिबक सुरू केले की पाणी वाळूच्या ‘कॉलम’द्वारे झिरपून दोन फुटांचा मातीचा थर अल्पावधीत सिंचित होतो. या तंत्रामुळे पाण्याचे बाष्पीभवन कमी होते. प्रयोगांचे उत्साहवर्धक परिणाम होतो. या योजनेच्या अधिक माहितीसाठी शेतकऱ्यांना आपल्या गावातील कृषी सहायक किंवा तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा असे आवाहन तालुका कृषी अधिकारी रवींद्र घुले यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!