लोकल न्यूज़
कर्जमाफीसाठी मतभेद विसरून एकत्र या : कडू
मुख्यमंत्र्यांच्या प्रतिमेला बांधल्या काळ्या राख्या

लोकतंत्र न्यूज नेटवर्क : कर्जमाफी हा विषय एका संघटनेचा, जातीचा किंवा धर्माचा नसून हा विषय राज्यातील शेतकऱ्यांच्या जीवन-मरणाचा विषय आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी सगळ्या संघटनांनी आपापसांतील मतभेद बाजूला करून एक समान कार्यक्रम आखून शेतकऱ्यांसाठी एकत्र येणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन प्रहार शेतकरी संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी चौंडी येथे केले. अध्यक्ष कडू शनिवारी (दि. ९) दुपारी १२च्या सुमारास चौंडी येथे आले होते. या वेळी ‘प्रहार’चे जिल्हाध्यक्ष विनोद सिंग परदेशी, प्रहार तालुकाप्रमुख नय्यूम सुभेदार, प्रहार जिल्हा उपाध्यक्ष जयसिंग उगले, शहराध्यक्ष दिनेश राळेभात, युवक तालुकाप्रमुख प्रमोद खोटे, सचिन उगले, राहुल भालेराव, संगीता ढोले, लक्ष्मी देशमुख, तुकाराम शिंगटे, सुनील लोंढे आदी उपस्थित होते. सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे राज्यात ६ लाख शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याच्या निषेधार्थ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रतिमेला काळ्या राख्या बांधत निषेध व्यक्त केला. या वेळी कडू यांनी अहिल्यादेवी होळकर यांचे दर्शन घेतले. या वेळी कडू म्हणाले की, शेतकऱ्यांनी यापुढे एकत्र आले पाहिजे. जर आपण एकत्र आलो तर बजेटमध्ये पन्नास टक्के वाटा दिला जाईल. पण शेतकऱ्यांना सरकारने धर्माच्या आणि जातीच्या झेंड्याखाली बांधले आहे. ही जाती-धर्माची जोखड फेकून देऊन हक्कासाठी सरकारविरोधात बंड पुकारावे लागेल, असे आवाहन त्यांनी केले. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबाबत सरकारने लवकर विचार करावा; अन्यथा सरकारविरोधात आंदोलन उभे करणार असल्याचे कडू यांनी या वेळी सांगितले.
आंदोलनाबाबत कडू यांची खंत – प्रहारतर्फे शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी चक्का जामसारखे आंदोलन करण्यातआले. त्या आंदोलनाला पाहिजे तसा प्रतिसाद मिळाला नाही. -बच्चू कडू प्रहार शेतकरी संघटनेचे अध्यक्ष



