लोकल न्यूज़

नुकसानग्रस्त भागाचे दोन दिवसांत पंचनामे पुर्ण करा : सभापती प्रा.राम शिंदेंचे जिल्हा प्रशासनाला निर्देश 

कर्जत व जामखेड तालुक्यातील सीनाकाठावरील नुकसानग्रस्त भागाची सभापती प्रा.राम शिंदेंनी केली पाहणी 

लोकतंत्र न्यूज नेटवर्क : सीना नदीच्या महापुराचा नदीच्या दोन्ही तीरावरील गावांना मोठा फटका बसला. शेतकऱ्यांची प्रचंड हानी झाली आहे. उभी पिकं वाहून गेली आहेत तसेच फळबागांचे प्रचंड नुकसान झाले. महापुरामुळे जमीनी खरडून गेल्या आहेत. या संकट काळात नुकसानग्रस्तांच्या पाठीशी सरकार खंबीरपणे उभे आहे.प्रशासनाने नुकसानग्रस्त भागाचे दोन दिवसांत पंचनामे पुर्ण करावेत, सीना नदीवरील भराव वाहून गेलेल्या सर्व बंधाऱ्यांची दुरूस्ती पाऊस संपताच हाती घेण्यात येईल, असा विश्वास विधानपरिषद सभापती प्रा राम शिंदे यांनी नुकसानग्रस्त भागाच्या दौर्‍यावेळी जनतेला दिला.

सभापती प्रा राम शिंदे यांनी बुधवारी सकाळी जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षक, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी तसेच जिल्हा प्रशासनाच्या सर्व विभागांच्या अधिकाऱ्यांसमवेत सीना नदी काठावरील कर्जत व जामखेड तालुक्यातील नुकसानग्रस्त गावांना भेटी दिल्या. त्यांनी कर्जत तालुक्यातील नागलवाडी, नागापूर, सितपुर, निंबोडी, मलठण, तरडगाव, दिघी, चिलवडी व जामखेड तालुक्यातील चोंडी या नुकसानग्रस्त गावांची पाहणी केली. संकटात सापडलेल्या शेतकरी व नागरिकांना आधार दिला. दोन दिवसाच्या आत नुकसानग्रस्त भागाचे पंचनामे करा, कोणीही पंचनाम्यापासून वंचित राहणार नाही याची काळजी घ्या, पंचनामे करताना जर स्टाफ कमी पडत असेल तर इतर तालुक्यातील स्टाफ या तालुक्यात वर्ग करून तातडीने परिपूर्ण पंचनामे शासनाला सादर करा, असे स्पष्ट निर्देश त्यांनी यावेळी जिल्हा प्रशासनाला दिले.

महापुरामुळे काहींच्या घरात पाणी घुसले. संसारोपयी साहित्याचे मोठे नुकसान झाले आहे. या बाधित कुटूंबांना तातडीने मदत करण्याच्या सुचना जिल्हाधिकारी व प्रांताधिकारी यांना दिल्या आहेत, असे यावेळी प्रा राम शिंदे म्हणाले.

सीना नदीला आलेल्या महापुरामुळे शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे. तसेच रस्ते, पूल, शाळा, आणि पायाभूत सुविधा गंभीरपणे बाधित झाल्या आहेत. शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळावी, प्रभावित कुटुंबांना अन्न, पाणी व वैद्यकीय मदत मिळावी आणि गावांतील दळणवळण सुरळीत व्हावे, यासाठी तातडीची कार्यवाही करण्याचे निर्देश यावेळी शिंदे यांनी प्रशासनाला दिले.

यावेळी जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया, पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विजय मुळीक, उपविभागीय अधिकारी नितीन पाटील, बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता विवेक माळूंदे, कार्यकारी अभियंता लक्ष्मीकांत जाधव, उप अभियंता शशिकांत सुतार, उप अभियंता प्रशांत वाकचौरे, जामखेडचे प्रभारी तहसीलदार मच्छिंद्र पांडुळे, गटविकास अधिकारी शुभम जाधव, यांच्यासह महसूल, कृषी, वन व जलसंधारण विभागाचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते. तसेच माजी जिल्हा परिषद सदस्य अशोक खेडकर, भाजपा तालुकाध्यक्ष बापुराव ढवळे, भाजपा जिल्हा सरचिटणीस पांडुरंग उबाळे, बापूसाहेब माने मिलिंद देवकर, सचिन चोरगे, दिनेश शिंदे सह कर्जत व जामखेड तालुक्यातील भाजपचे प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

नैसर्गिक आपत्तीमुळे संकटात सापडलेल्या जनतेच्या पाठीशी सरकार आणि प्रशासन खंबीरपणाने उभे आहे.कोणीही खचून जाऊ नका, ऐकमेकांना सहकार्य करा. संकटकाळात मी तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. लवकरच सर्व पंचनामे पुर्ण होतील. कोणीही पंचनाम्यापासून वंचित राहणार नाही. पंचनाम्याचा परिपूर्ण प्रस्ताव शासनाकडे सादर झाल्यानंतर नुकसान भरपाई मिळावी यासाठी मी शासनाकडे पाठपुरावा करेल, पाऊस कमी होताच सीना नदीतील सर्व बंधाऱ्यांची जलसंपदा विभागाकडून दुरूस्ती हाती घेण्यात येईल.

 – प्रा राम शिंदे, सभापती,महाराष्ट्र विधान परिषद

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!