लोकल न्यूज़
निवेदनानंतर प्रशासन जागे! : जामखेड शहरात सोलर पथदिव्यांचे काम पुन्हा सुरू
शिवप्रतिष्ठानचे पांडुरंजे भोसले यांच्या मागणीला यश

लोकतंत्र न्यूज नेटवर्क :
जामखेड शहरात सोलर पथदिवे बसविण्याचे काम बराच काळ रखडले होते. अनेक ठिकाणी फाउंडेशन तयार करण्यात आले असले तरी प्रत्यक्ष पथदिवे बसविण्याचे काम करण्यात आले नव्हते. यामुळे नागरिकांना, विशेषतः महिलांना, रात्रीच्या वेळी असुरक्षिततेचा सामना करावा लागत होता.
शासनाकडून या कामासाठी पुरेसा निधी उपलब्ध करून देण्यात आला असूनही ठेकेदाराकडून वारंवार “आज बसवू, उद्या बसवू” अशी आश्वासने दिली जात होती. या पार्श्वभूमीवर श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे अध्यक्ष पांडुरंग मधुकर भोसले यांनी नगरपरिषदेसह आमसभेमध्ये दोन वेळा निवेदन देऊन या विषयाकडे प्रशासनाचे लक्ष वेधले होते.
यासाठी मुख्याधिकारी नगरपरिषद जामखेड यांना 17 तारखेला निवेदन देण्यात आले होते व त्यामध्ये जर हे काम झाले नाही तर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा देण्यात आला होता.
याची दखल घेत अखेर प्रशासनाला जाग आली असून शहरातील काही ठिकाणी सोलर पथदिवे बसविण्याचे काम प्रत्यक्षात सुरू झाले आहे.
ऐन दिवाळीत हे सोलर दिवे बसवल्यामुळे त्या ठिकाणचा अंधार दूर झाल्याने नागरिकांकडून पांडूराजे यांचे आभार मानले जात आहेत.




