लोकल न्यूज़

जामखेड मध्ये वंदे मातरम गीताचा 150 वा वर्धापन दिन उत्साहात साजरा

वंदे मातरम घोषणानी परिसर दुमदूमला

लोकतंत्र न्यूज नेटवर्क –

​जामखेड: स्वातंत्र्यलढ्याला प्रेरणा देणाऱ्या ‘वंदे मातरम’ या राष्ट्रगीताच्या १५० व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून, जामखेड येथे दिनांक ०७ नोव्हेंबर २०२५ रोजी एक भव्य आणि उत्साही सामूहिक गीतगायन व सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (ITI), जामखेड यांच्या वतीने ल.ना. होशिंग विद्यालय, जामखेड येथे हा सोहळा पार पडला, ज्यामध्ये सुमारे ५००० हून अधिक विद्यार्थी, शासकीय-अशासकीय कर्मचारी आणि नागरिक सहभागी झाले होते.

​ऐतिहासिक महत्त्व आणि आयोजनाचा उद्देश

​बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांनी १८७५ साली लिहिलेल्या ‘आनंदमठ’ या कादंबरीतील हे गीत भारतीय स्वातंत्र्यलढ्यात अद्वितीय महत्त्वाचे ठरले आहे. भारतमातेच्या स्तुतीचे प्रतीक असलेले हे गीत असंख्य क्रांतिकारकांसाठी प्रेरणास्रोत होते. या गीताला ०७ नोव्हेंबर २०२५ रोजी १५० वर्षे पूर्ण होत असल्याने, राज्याच्या सर्व तालुक्यांमध्ये हा वर्धापन दिन उत्साहाने साजरा करण्याचे ठरले होते. त्याचाच एक भाग म्हणून जामखेड येथे या सामूहिक गीतगायनाचे आयोजन करण्यात आले.

​या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान श्री. शुभम जाधव, गटविकास अधिकारी, जामखेड यांनी भूषविले, तर श्री. अमित राऊत, सामाजिक कार्यकर्ते, प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित होते. आयटीआयमधील प्रशिक्षणार्थींनी याप्रसंगी देशभक्तीपर लघुनाटिका सादर करून उपस्थितांची मने जिंकली. ल.ना. होशिंग विद्यालयातील विद्यार्थिनींसह नागेश विद्यालय, कन्या विद्यालय, नवीन मराठी शाळा, खेमानंद इंग्लिश स्कूल, कालिका पोदार लर्न स्कूल, अँग्लो उर्दू विद्यालय यांसारख्या विविध शाळांमधील विद्यार्थ्यांनी उस्फूर्तपणे सहभाग घेत सामूहिकरीत्या ‘वंदे मातरम’ या गीताचे गायन केले.

​या कार्यक्रमास जामखेड मधील प्रसिद्ध उद्योजक रमेश भाऊ गुगळे ,संतोष फिरोदिया, विवेक कुलकर्णी,तहसीलदार श्री प्रदीप पांडुळे मुख्याधिकारी श्री अजय साळवे,,सहायक निबंधक दिलीप तिजोरे,निकम महाराज, विनायक राऊत, आनंद राजगुरू, बाळासाहेब दळवी ,उमेश देशमुख, प्रा. धनंजय जवळेकर ,संतोष टेकाळे श्रीमती सना शेख, डॉ. सुनील बोराडे ,प्राजक्ता खोमणे, चेतन दासनूर तसेच जामखेड तालुक्यातील सर्व शासकीय आस्थापनांमधील अधिकारी, प्रतिनिधी  यांच्यासह अनेक प्रतिष्ठित नागरिक, पालक आणि मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

​कार्यक्रमाचे प्रास्ताविक ल.ना. होशिंग विद्यालय जामखेडचे प्राचार्य मा. श्री. बी. ए. पारखे यांनी केले. आभार प्रदर्शन पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य मा. श्री. अजय वाघ यांनी केले, तर सूत्रसंचालन ल.ना. होशिंग विद्यालयाचे पर्यवेक्षक श्री. अनिल देडे यांनी केले.

​हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, तांत्रिक विद्यालय जामखेड येथील सर्व गटनिदेशक, शिल्पनिदेशक, कर्मचारी आणि प्रशिक्षणार्थी, तसेच एनएसएस कार्यक्रमाधिकारी श्री. गजेंद्र जाधव व स्वयंसेवक यांनी अविरत परिश्रम घेतले. या ऐतिहासिक सोहळ्यामुळे जामखेड शहरात देशभक्तीचे आणि राष्ट्रीय एकात्मतेचे वातावरण निर्माण झाले होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!