धर्म
जवळेश्वर रथयात्रेला उत्साहात सुरुवात
महाराष्ट्रातील सर्वात मोठा रथ; आषाढी एकादशी ते गुरुपोर्णिमा असा पाच दिवस चालणार उत्सव

जवळा : तालुक्यातील जवळा येथील श्री जवळेश्वर रथयात्रेस आज बुधवार (दि.१७) आषाढी एकादशीदिवशी पासून प्रारंभ झालं आहे. आषाढी एकादशी ते गुरुपोर्णिमा अशी पाच दिवस यात्रा साजरी होणार आहे. आषाढी एकादशी ते गुरुपोर्णिमा अशा पाच दिवस चालणाऱ्या आषाढी रथयात्रेस महाराष्ट्राच्या कानाोपऱ्यातून मोठ्या संख्येने ग्रामस्थ येतात.
रथयात्रेची ही प्रथा अंदाजे २०० वर्षांपूर्वीपासून असावी , असे जाणकार मंडळी सांगतात. आषाढी एकादशीच्या दिवशी जवळेश्वराची आरती करून यात्रेस प्रारंभ होतो. रात्री ९ वाजल्यापासून गावातील एकूण १० ते ११ मंडळांच्या नर्तिकांचे नाचगाण्याचे कार्यक्रम ठिकठिकाणी रात्रभर चालतात. रात्री दीडच्या सुमारास सर्व मंडळांच्या नर्तिका जवळेश्वर मंदिरासमोर येऊन जवळेश्वराची आरती करतात.
यात्रेनिमित्त जवळेश्वर मंदिराला केलेली विद्युत रोषणाई डोळे दिपवणारी आहे. चौथ्या दिवशी गुरुपोर्णिमेनिमित्त मुख्य रथयात्रा साजरी केली जाते. सकाळी जवळेश्वराची आरती करून, जवळेश्वर मुकुटाची रथामध्ये विधिवत प्राणप्रतिष्ठापणा केली जाते. यावेळी भाविक रथाला नैवेद्य अर्पण करतानाच नाराळाचे तोरण रथावर चढवतात. ही नारळांची संख्या १० ते १५ हजारांपर्यंत असते. दुपारी एकच्या सुमारास जवळेश्वराची आरती करून मंदिरासमोरून रथाची मिरवणूक हर हर महादेवाच्या गजरात आणि जवळेश्वराच्या जयघोषात मुख्य रस्त्यावरून काढण्यात येते. रथाला दोर लावून भाविक रथ ओढतात. सायंकाळी रथ वेशीतून आत आल्यानंतर मारुतीच्या मंदिरासमोर दहीहंडी फोडून आनंद साजरा केला जातो. त्याचबरोबर फटाक्यांची आतषबाजी केली जाते.
मध्यरात्रीपर्यंत रथ जवळेश्वर मंदिरासमोर येतो त्यावेळेस गावातील सर्व मंडळांच्या नर्तिका वाद्यवृंद पथके जवळेश्वर मंदिराच्या प्रांगणात एकत्र येतात. यावेळी होणारी जुगलबंदी पाहण्यासारखी असते.
महाराष्ट्रातील सर्वांत मोठा रथ
महाराष्ट्रातील सर्वांत मोठा व खूप वर्षांपूर्वीचा रथ १९ व्या शतकाच्या सुरुवातीला संपूर्ण सागाच्या लाकडापासून यदू पंढरीनाथ सुरवसे या सुताराने बनविला आहे. आज रथ तयार करून २०० वर्षांहूनही अधिक काळ होऊनही आजही हा रथ सुस्थितीत आहे. स्टेअरिंग नसल्याने तो वळविण्यासाठी रथाच्या पाठीमागे आणि समोर मोठा नाडा (दोर) बांधलेला आहे. हा नाडा (दोर) बांधण्याचा मान मते यांचा आहे. २०० ते २५० भाविक हा रथ ओढतात. हा रथ पुढे मागे करूनच वळविण्यात येतो. दरवर्षी रथयात्रेनिमित्त जवळेश्वर मूर्ती प्रतिष्ठापने अगोदर रथ पाण्याने धुवून संपूर्ण रथास तेल लावले जाते. तर गुरुपोर्णिमेच्या दिवशी सकाळी जवलेश्वराची आरती करुन मुकुटाची रथामध्ये प्रतिष्ठापना केली जाते. आरतीचा मान पाटील व कुलकर्णी यांना आहे.
जवळा गाव पाच ऋषींचे पांढर
जवळा गाव हे जवळेश्वर, बाळेश्वर, काळेश्वर, बेलेश्वर व नंदकेश्वर या पाच ऋषींचे पांढर म्हणून प्रसिद्ध आहे. सर्व पाचही लिंगे प्रभू रामचंद्रापासूनची स्वयंभू आहेत. प्रभू रामचंद्राचे जामखेड जवळील सौताडा येथे वास्तव्य होते. ही पाच लिंगे त्यांनी निर्माण केल्याची अख्यायिका आहे. पाचपैकी जवळेश्वरचे हेमांडपंथी मंदिर, बाळेश्वर आणि काळेश्वर गावातच, बेलेश्वर गावच्या शिवारात, तर नंदकेश्वर लिंग पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी बांधलेल्या बारवेत आहे. जवळेश्वराचे मंदिर शके १७१६ मध्ये बांधले आहे. गाभाऱ्याच्या डाव्या बाजूला गणपती व उजव्या बाजूला भैरवनाथ असून , मंदिर परिसराचे बांधकाम सन १८१४ मध्ये झाले आहे. शिखराचे काम मे १९९६ मध्ये झाले आहे.



