लोकल न्यूज़
मुख्यमंत्री समृध्द पंचायतराज अभियान अंतर्गत जामखेड तालुकास्तरीय कार्यशाळा उत्साहात संपन्न.

लोकतंत्र न्यूज नेटवर्क
मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान अंतर्गत जामखेड तालुकास्तरीय कार्यशाळा आनंद भंडारी मुख्य कार्यकारी अधिकारी व दादाभाऊ गुंजाळ उपमुख्य कार्यकारी अधिकारी ( ग्रामपंचायत) यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक १५ सप्टेंबर २०२५ वार सोमवार रोजी राज लॉन्स, जामखेड या ठिकाणी पार पडली.कार्यशाळेसाठी तालुक्यातील सरपंच,उपसरपंच,ग्रामपचायत सदस्य,ग्रामपंचायत अधिकारी,ग्रामपंचायत कर्मचारी,केंद्र चालक,ग्रामरोजगार सहाय्यक,बचत गट महिला व आशा सेविका इ.मोठ्या संख्येने उपस्थित होते .
कार्यशाळेचे अध्यक्षस्थान शिवम डपकर जिल्हा जलसंधारण अधिकारी जिल्हा परिषद अहिल्यानगर यांनी भूषविले. तसेच कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून विजय मुळीक अति.मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद अहिल्यानगर यांनी उपस्थित राहून प्रमुख मार्गदर्शन केले.
कार्यशाळेसाठी डॉ.भगवान मुरूमकर मा.सभापती,दत्ता वारे मा.जिल्हा परिषद सदस्य, विश्वनाथ राऊत मा.जिल्हा परिषद सदस्य, बापूराव ढवळे तालुका अध्यक्ष भारतीय जनता पार्टी, शरद कार्ले सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती जामखेड, वैजीनाथ पाटील संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती आदी मान्यवर उपस्थित होते. उपस्थित पदाधिकारी यांनी आपले मनोगत व्यक्त करताना जामखेड तालुक्यात मुख्यमंत्री समृध्द पंचायतराज अभियानात सर्व स्तरातील नागरिकांनी व आजी-माजी पदाधिकाऱ्यांनी सहभाग घेऊन जामखेड तालुक्यामध्ये अभियान यशस्वी करण्याचा संकल्प केला. तसेच तालुका अंतर्गतच बक्षीस घ्यावयाचे नसून जिल्हा व राज्य पातळीवरही बक्षीसासाठी जामखेड तालुक्यातील ग्रामपंचायती पात्र झाल्या पाहिजे अशी आग्रही भूमिका पदाधिकाऱ्यांनी मांडली.
तालुक्याचे गटविकास अधिकारी शुभम जाधव यांनी अभियानाच्या प्रश्नावली व उपक्रमाबाबत लोक सहभाग घेऊन अभियान प्रभावीपणे राबविण्याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.तसेच तालुक्यातील सर्व ग्रामपंचायती अंतर्गत दिनांक १७ सप्टेंबर २०२५ रोजी विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले आहे. या ग्रामसभेत जास्तीत जास्त मतदारांनी आपला सहभाग नोंदवून ग्रामसभेत नियोजन करून अभियान यशस्वी करावे असे आवाहन केले.





