लोकल न्यूज़

सामाजिक कार्यकर्ते अवधूत पवार यांचे उपोषण स्थगित

महामार्गाची हद्द निश्चिती ४ मार्चपासून

लोकतंत्र न्यूज नेटवर्क :जामखेड (प्रतिनिधी) :जामखेड शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाच्या कामातील अनियमितता आणि अतिक्रमणांबाबत सुरू असलेले सामाजिक कार्यकर्ते अवधूत पवार यांचे आमरण उपोषण प्रशासनाच्या लेखी आश्वासनानंतर बुधवारी रात्री उशिरा स्थगित करण्यात आले. महामार्गाची हद्द निश्चित करण्याचे काम ४ मार्चपासून पोलीस बंदोबस्तात सुरू करण्याचे आश्वासन देण्यात आले असून, यामुळे गुरुवारी पुकारण्यात आलेला ‘जामखेड बंद’ देखील मागे घेण्यात आला आहे.

प्रशासनाची विश्वासार्हता पणाला! तहसीलदार, पोलीस निरीक्षक आणि मुख्याधिकारी यांच्या उपस्थितीत हे आश्वासन मिळालं आहे. आता ४ मार्च ही केवळ तारीख नाही, तर जामखेड प्रशासनाच्या विश्वासार्हतेची ‘लिटमस टेस्ट’ आहे.

​गेल्या दोन दिवसांपासून अवधूत पवार हे अतिक्रमण मुक्त शहरासाठी तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषणाला बसले होते. या आंदोलनाला शहरातील सर्व राजकीय पक्ष, सामाजिक संघटना आणि व्यापाऱ्यांनी मोठा पाठिंबा दिला होता. उपोषणाची दखल घेत बुधवारी दुपारी तहसीलदार मच्छिंद्र पाडळे, पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी, मुख्याधिकारी अजय साळवे आणि राष्ट्रीय महामार्ग विभागाचे अभियंता श्री. चेमटे यांच्या उपस्थितीत ५ तास मॅरेथॉन बैठक झाली.

आश्वासनाचा ‘गाजर’ की प्रामाणिक प्रयत्न? राष्ट्रीय महामार्ग विभागाने ४ मार्चची तारीख दिली आहे. पण प्रश्न असा उरतो की, जे काम गेल्या कित्येक महिन्यांपासून रखडलं होतं, त्यासाठी प्रशासनाला दोन दिवसांच्या उपोषणाची आणि शहराच्या बंदची वाट का पाहावी लागली? ही मोजणी आधी का होऊ शकली नाही? की फक्त आंदोलनाची धार कमी करण्यासाठी ४ मार्चचा ‘मुहूर्त’ काढला गेलाय?

​या बैठकीत महामार्ग विभागाने ४ मार्चपासून हद्द निश्चितीच्या कामाला प्रत्यक्ष सुरुवात करण्याचे लेखी पत्र दिले. या आश्वासनानंतर तहसीलदार पाडळे यांच्या हस्ते लिंबू रस घेऊन पवार यांनी उपोषण स्थगित केले. यावेळी बोलताना पवार म्हणाले की, “आमरण उपोषण स्थगित केले असले तरी, मोजणी सुरू होईपर्यंत साखळी उपोषण सुरूच राहणार आहे. जर वेळेत काम सुरू झाले नाही, तर आंदोलन पुन्हा तीव्र केले जाईल.”

​दरम्यान, प्रशासनाच्या सकारात्मक प्रतिसादामुळे नागरिकांची व व्यापाऱ्यांची गैरसोय टाळण्यासाठी उद्याचा ‘जामखेड बंद’ मागे घेण्यात येत असल्याचे सर्वपक्षीय नेत्यांनी जाहीर केले. उद्यापासून शहरातील सर्व दुकाने व व्यवहार सुरळीत सुरू राहतील. या निर्णयामुळे गेल्या दोन दिवसांपासून शहरात असलेला तणाव निवळला असून, आता ४ मार्चच्या कारवाईकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

“हा तर ट्रेलर, पिक्चर अजून बाकी आहे!”उपोषण स्थगित केल्यानंतर प्रतिक्रिया देताना आंदोलकांनी स्पष्ट केले की, हे केवळ लेखी आश्वासन आहे. जर ५ मार्चपर्यंत प्रशासनाने प्रत्यक्ष कारवाईत हलगर्जीपणा केला, तर यापेक्षाही तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडले जाईल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!