Uncategorized
जामखेडमध्ये कत्तलीसाठी डांबलेले ८ गोवंश पोलिसांच्या छाप्यात मुक्त
श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचा आक्रमक पवित्रा

लोकतंत्र न्यूज नेटवर्क –
जामखेड शहरात कत्तलीच्या उद्देशाने निर्दयीपणे डांबून ठेवलेल्या ८ गोवंशांना पोलिसांनी धाड टाकून मुक्त केले आहे. श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या पदाधिकाऱ्यांनी दाखवलेल्या तत्परतेमुळे ही मोठी कारवाई यशस्वी झाली असून, या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील कुरेशी मोहल्ला या मध्यवर्ती भागात काही गोवंश कोणत्याही चारा-पाण्याशिवाय डांबून ठेवण्यात आले होते. मानद पशु कल्याण अधिकारी शिवशंकर स्वामी आणि श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे अध्यक्ष पांडुराजे मधुकर भोसले यांना ही माहिती मिळताच त्यांनी तातडीने जामखेड पोलिसांशी संपर्क साधला. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत छापा टाकला आणि ८ गोवंशांना ताब्यात घेतले. या सर्व गोवंशांची मुळेवाडी येथील रुक्मिणी गोशाळेत सुखरूप रवानगी करण्यात आली असून जामखेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या कारवाईनंतर बोलताना श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे अध्यक्ष पांडुराजे भोसले यांनी नगरपरिषद आणि स्थानिक प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर तीव्र संताप व्यक्त केला. शहरातील बेकायदेशीर कत्तलखान्यांबाबत नगरपरिषदेला वारंवार निवेदने देऊनही कोणतीही ठोस कारवाई केली जात नसल्याचा आरोप त्यांनी केला. शहराच्या भरचौकात उघडपणे बीफ खानावळी सुरू असूनही प्रशासन केवळ बघ्याची भूमिका घेत असल्याचे त्यांनी म्हटले.
या गंभीर विषयावर आमदार रोहित पवार आणि सभापती राम शिंदे यांनाही निवेदने देण्यात आली आहेत, मात्र अपेक्षित कारवाई होत नसल्याची खंत भोसले यांनी व्यक्त केली.
पोलिसांनी केलेली कारवाई अपुरी असून प्रशासनाने जर शहरातील सर्व बेकायदेशीर कत्तलखाने तातडीने बंद केले नाहीत, तर श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल,
पांडुराजे भोसले,अध्यक्ष,
शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, जामखेड


