लोकल न्यूज़
जिव्हाळा फाउंडेशन’च्या वतीने जामखेड येथे सामाजिक विषयांवर विशेष चर्चासत्राचे आयोजन
सद्य सामाजिक आव्हाने, युवा पिढी समोरील प्रश्न आणि शिक्षण व्यवस्थेवर विचारवंतांचे मंथन

लोकतंत्र न्यूज नेटवर्क -जामखेड (प्रतिनिधी): येथील जिव्हाळा फाउंडेशनच्या वतीने ‘जागर लोकशाहीचा’ या अभियानांतर्गत सामाजिक, शैक्षणिक आणि कौटुंबिक विषयांवर एका विशेष चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. या चर्चासत्रात समाजातील वाढती गुन्हेगारी, तरुण पिढीसमोरील आव्हाने, ग्रामीण भागातील समस्या आणि शैक्षणिक बदल यावर विविध क्षेत्रांतील अभ्यासक आणि विचारवंतांनी आपली मते मांडली.
चर्चासत्रात प्रामुख्याने तरुण पिढीमध्ये निर्माण होत असलेल्या सामाजिक समस्यांवर चिंता व्यक्त करण्यात आली. मोबाईल आणि सोशल मीडियाच्या अतिवापरामुळे पालक आणि मुलांमधील संवाद कमी होत चालला आहे. अल्पवयीन व तरुण मुली घरातून निघून जाण्याच्या वाढत्या घटना आणि त्याचे कौटुंबिक स्तरावर होणारे गंभीर परिणाम यावर श्री. कदम सर यांनी सविस्तर प्रकाश टाकला. अशा प्रकरणांमध्ये कायदेशीर त्रुटींचा गैरवापर थांबवण्यासाठी आणि अनधिकृत विवाहावर नियंत्रण आणण्यासाठी कायदेशीर तरतुदी अधिक कडक करण्याची गरज वक्त्यांनी व्यक्त केली. शाळा-महाविद्यालयांमधून संस्कार आणि नैतिक शिक्षणावर अधिक भर देण्याचे आवाहन श्री भोरे मेजर यांनी केले.
ग्रामीण भागातील सद्य परिस्थितीवर बोलताना प्रा. मधुकर राळेभात यांनी तरुणांच्या रोजगाराचा आणि शेतकरी कुटुंबातील मुलांच्या विवाहाचा प्रश्न उपस्थित केला. सद्यस्थितीत उच्चशिक्षित तरुणांनाही नोकरी मिळण्यात येणाऱ्या अडचणी आणि त्यामुळे शेतकऱ्यांच्या मुलांना विवाह जमवताना येणारे अडथळे यावर चर्चा झाली. समाजातील विवाहविषयक मानसिकतेत लवचिकता आणण्याची गरज असून शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहणे हे सामाजिक कर्तव्य असल्याचे प्रतिपादन वक्त्यांनी केले
बदलत्या शैक्षणिक धोरणावर बोलताना, ग्रामीण भागातील शासकीय आणि अनुदानित शाळा-महाविद्यालयांच्या सद्यस्थितीवर चिंता व्यक्त करण्यात आली. शिक्षण सर्वसामान्यांच्या आवाक्यात राहण्यासाठी सामाजिक स्तरावर प्रयत्न होणे गरजेचे आहे. तसेच, कायदा व सुव्यवस्था अधिक मजबूत करण्यासाठी नागरिकांची सजगता आणि प्रशासकीय पारदर्शकता अत्यंत महत्त्वाची असल्याचे मत मांडण्यात आले.
स्वातंत्र्य, समता आणि बंधुभाव ही मूल्ये तसेच संत तुकाराम महाराज आणि स्वामी विवेकानंद यांच्या विचारांचा आदर्श समोर ठेवून समाजाने एकत्र येणे गरजेचे असल्याचा सूर उमटला. या कार्यक्रमाचे मुख्य वैशिष्ट्ये म्हणजे जामखेड शहरातील निवृत्त शिक्षकांनीच ही संकल्पना काढून आपणही समाजाचे काहीतरी देणे लागतो या भावनेतून समाज प्रबोधनाचा शिवधनुष्य हाती घेण्याचे ठरले आहॆ.
या चर्चासत्रात मधुकर आबा राळेभात, गुलाब जांभळे, ढाळे सर, कदम सर, वीर सर, रवींद्र कडलग यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमास परिसरातील सुजाण नागरिक, विविध संस्थांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
”केवळ प्रशासनावर विसंबून न राहता प्रत्येक नागरिकाने आपल्या वेळेतील काही भाग सामाजिक कार्यासाठी व जनजागृतीसाठी दिला पाहिजे, तरच गाव आणि समाजपातळीवर सकारात्मक बदल घडून येईल.”
– श्री गुलाब जांभळे, आयोजक, जिव्हाळा फाउंडेशन


